पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. नृत्यकलेचा जन्म मानवाच्या जन्माबरोबरच झालेला आहे. नुकतेच जन्मलेले मूल आपल्याला हवे नको ते शब्दांच्या माध्यमातून सांगू शकत नाही; म्हणून ते आपला आनंद हातापायांची हालचाल करून व्यक्त करते. एखादी गोष्ट जेव्हा त्याला नकोशी वाटते. तेव्हाही ते आपली नाराजी रडून व हातपाय झाडून व्यक्त करते. चालते, बोलते मूलही आपला आनंद नाचून उड्या मारूनच प्रकट करते. मोठी माणसेदेखील आनंदाच्या क्षणी उत्स्फूर्तपणे नाचू लागतात. याचाच अर्थ नृत्य हे माणसाच्या जीवनात उपजतच आहे, असा होतो. निसर्गातून तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवनातूनही मानवाला नृत्याची प्रेरणा मिळते. वाऱ्यामुळे पानांची हालचाल विशिष्ट प्रकारे होते. वर्षा ऋतूत बिजलीचे नृत्य सुरू होते. अळवाच्या पानावर जलबिंदू नाचत राहतात. सागराच्या पृष्ठभागावर लाटांचे अखंड नृत्य सुरू असते. पावसाची शक्यता निर्माण होताच मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. अशाप्रकारे निसर्गात सर्वत्र भरून राहिलेल्या नर्तन क्रियेने माणसात या कलेविषयी ओढ निर्माण झाली. माणसाने या नाचत्या निसर्गाचे अनुकरण करता करता या कलेचा हळूहळू विकासही झाला.
बोलताही न येणाऱ्या बाळाची कोणती हालचाल निराशा दर्शवते?
Options
हात उंचावणे
हातपाय झाडणे
खुदूखुदू हसणे
पुढे पुढे सरकणे